असहकार चळवळ
असहकार चळवळ इ.स.१९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. गांधीजींचे दक्षिण अाफ्रिकेतील कार्य : महात्मा गांधी १८९३ मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. १९०६ मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते, त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. ...