१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ चा स्वातंत्र्यलढा १८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेणा दिली. १८५७ पूर्वीचे लढे : भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरांतून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. अशातच १७७० मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. ...