पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थाच्या गुणधर्मात फरक आढळतो. त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण व गाभा असे तीन भाग मानले जातात. यासाठी आकृती पहा. यांतील सर्वांत बाहेरचा थर घन खडकांनी तयार झाला आहे. यांस भूकवच म्हणतात. भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात. भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यास शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी सुमारे १०० किमी असते. प्रावरणाच्या खालील भागास गाभा म्हणतात. (आकृती पहा.) भूकवच | भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही. भूखंडाखाली ती सुमारे ४० किमी, तर सागरतळाखाली ती सुमारे ८ किमी आढळते. हिमालयासारख्या पर्वतक्षेत्रात ही जाडी सुमारे ७० किमीपर्यंत आढळते. भूकवचाची सरासरी जाडी ३० किमी आहे. भूकवचाचे पुढील दोन भाग केले जातात. (अ) सियाल : भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या थरातील खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अॅल्युमिनिअमचे प्रमाण अधिक आढळते. ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात. बहुतेक खंडांची निर्मिती सियालपासून झाली आहे. या थराची जाडी भ...