केंद्रीय कार्यकारी मंडळ
केंद्रीय कार्यकारी मंडळ संघशासनाची रचना : राष्ट्रपती : भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत, तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. राष्ट्रपतींची निवड : राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरीत्या होते. भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात. राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय ३५ वर्षे पूर्ण...