युरोप आणि भारत
युरोप आणि भारत
आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या
विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते.
त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड
अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात
घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो.
प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा
अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६
वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या
कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि
भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया
घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’
असे म्हणतात.
प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य,
तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे
पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला
चालना मिळाली. प्रबोधनकाळात मानवतावादाला
चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व
विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे
व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलां-
क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा आविष्कार
पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व
साहित्यामधून मानवी भावभावना अाणि संवेदनांचे
चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक
भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. इ.स.१४५०
च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई
यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे
विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत
पोहचू लागले.
धर्मसुधारणा चळवळ : स्वतंत्र बुद्धीने विचार
करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या
जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या
अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे
स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना
लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू
झाली तिला ‘धर्मसुधारणा चळवळ’ असे म्हणतात.
या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व
बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.
भौगोलिक शोध : इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन
तुर्कांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले
कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले. या
शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे
व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे
युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा
शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक
शोधांचे नवे पर्व सुरू झाले.
युरोपातील वैचारिक क्रांती : प्रबोधन काळात
झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक
युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात
युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान
व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला.
प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे
चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या
संपूर्ण बदलांना ‘वैचारिक क्रांती’ असे संबोधले जाते.
या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये
संशोधनाला चालना मिळाली.
राजकीय क्षेत्रातील क्रांती : आधुनिक
कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक
राजकीय स्थित्यंतरे घडून आली. १८ व्या तसेच १९
व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे
हा कालखंड ‘क्रांतियुग’ म्हणून ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास
झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला.
इ.स. १६८९ च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या
अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे
सार्वभौमत्व प्रस्थापित झाले.
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध : युरोपात घडणाऱ्या
क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील
स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते.
अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले
लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय
देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन
तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर
अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन
केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नाममात्र
वर्चस्व होते. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने
अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास
सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय
जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना
दडपण्यासाठी वसाहतींविरोधात युद्ध पुकारले.
अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली
सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस
वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना
‘अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून ओळखली जाते.
यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य
शासनपद्धती, लिखित राज्यघटना असणारा व
लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात
आला.
फ्रेंच राज्यक्रांती : इ.स.१७८९ मध्ये फ्रान्समधील
जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक
राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला
आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना
‘फ्रेंच राज्यक्रांती’ म्हणून ओळखली जाते. फ्रेंच
राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या
मूल्यांची देणगी दिली.
जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
औद्योगिक क्रांती : अठराव्या शतकाच्या
उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात
क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर
चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले.
छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या
कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा
वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी
वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले.
यालाच ‘औद्योगिक क्रांती’ असे म्हणतात.
इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला
आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्त्य जगात
पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट
इतकी झाली, की इंग्लंडचे वर्णन ‘जगाचा कारखाना’
असे केले जाऊ लागले.
भांडवलशाहीचा उदय : नव्या सागरी मार्गांच्या
शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या
नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील
देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले.
मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी
पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र
येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल
असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या.
पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या
व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे.
त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना
लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या
व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस
लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात
व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला.
यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा
उदय झाला.
वसाहतवाद : एका देशातील काही लोकांनी
दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती
करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक
व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच् बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी
आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच
‘वसाहतवाद’ होय.
युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी
प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.
साम्राज्यवाद : विकसित राष्ट्राने अविकसित
राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व
अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच
‘साम्राज्यवाद’ होय. आशिया व आफ्रिका खंडांतील
अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी
महत्त्वाकांक्षेला बळी पडली.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील
साम्राज्यवाद : भारतात व्यापारी मक्तेदारी
मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा
होती. इ.स.१६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार
करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
केली होती. या कंपनीने जहांगीर बादशाहाकडून
परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली.
या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत
असे.
इंग्रज व फ्रेंच संघर्ष : भारतातील व्यापारी
स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.
या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे
झाली. ती युद्धे ‘कर्नाटक युद्धे’ म्हणून ओळखली
जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा
निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया
कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.
बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या
सत्तेचा पाया : बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत
समृद्ध असा प्रांत होता. इ.स.१७५६ साली सिराज
उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया
कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहाकडून बंगाल
प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर
करत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता
येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली.
यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून
कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने
इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह
याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर
यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने
वळवले. इ.स.१७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज
उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर
जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न
उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब
बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर
कासीम यास त्यांनी नवाब बनवले. मीर कासीमने
इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा
प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद
दिले.
बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम
घालण्यासाठी मीर कासीम, अयोध्येचा नवाब शुजा
उद्दौला आणि मुघल बादशाह शाहआलम यांनी
इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इ.स.१७६४
मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात
इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या
तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल
गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया
कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी
सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.
इंग्रज-म्हैसूर संघर्ष :
म्हैसूर राज्यातील
हैदरअलीने उठाव करून
म्हैसूरचे राज्य ताब्यात
घेतले. हैदरअलीच्या
मृत्यूनंतर त्याचा मुलगा
टिपू सुलतान म्हैसूरच्या
सत्तेवर आला. त्याने
इंग्रजांविरुद्धचा लढा
शर्थीने लढवला. अखेर
१७९९ मध्ये श्रीरंगपट्टण
येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला.
अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व
निर्माण झाले.
सिंधवर इंग्रजांचा ताबा :
भारतातील आपली
सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे
वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण
करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून इंग्रजांनी
अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे
ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून
जात होते. यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात
आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध गिळंकृत
केला.
शीख सत्तेचा पाडाव :
एकोणिसाव्या शतकाच्या
प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती
होती. रणजितसिंहाच्या
मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन
मुलगा दलीपसिंग गादीवर
बसला. त्याच्या वतीने त्याची
आई राणी जिंदन राज्याचा
कारभार पाहू लागली, मात्र
सरदारांवर तिचा अंकुश राहिला
नाही. ही संधी साधून इंग्रजांनी
काही शीख सरदारांना फितूर
केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार, असा
शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला
केला. या पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा
पराभव झाला. दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम
ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही
स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. मुलतानचा
अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले.
हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले.
या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. १८४९
मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला
जोडला.
Enrgraj - Sikh War