प्राचीन भारत आणि जग

प्राचीन भारत आणि जग

भारत आणि पश्चिमेकडील देश 


हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचापश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. 

त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गांनी आला, ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात  सापडल्या, म्हणून त्या शैलीस ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती.

इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला होता. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत.

तमिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. दोन् ठिकाणे भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. 

तिथून तो युरोपातील देशांमध्येपाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोचवले. गणितातील ‘शून्य’ ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. 

भारत आणि आशिया खंडातील इतर देश 


आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला होता. श्रीलंका ः बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्येपाठवले होते. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख ‘महावंस’ या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या पाचव्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. श्रीलंकेतील ‘महावंस’ आणि ‘दीपवंस’ हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परसंबंधांची माहिती देतात. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत


चीन आणि इतर देश 

प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात ‘चीनांशुक’ असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुक पश्चिमेकडील देशांमध्येपाठवत असत. हा व्यापार खुश्कीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला ‘रेशीम मार्ग’ असेही म्हणतात. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नाला-सोपारा हे एक होते. भारतात आलेले फाहियान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट ‘मिंग’ याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यपमातंग हे बौद्ध भिक्खूचीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्येही पोहचला.

आग्नेय आशियातील देश 

 कंबोडिया या देशातील ‘फुनान’ या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चिनी परंपरेच्या आधारे कौंडिण्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली, अशी माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे. तो संस्कृतमध्ये आहे. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती. या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यांवर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यांतील कथांवर आधारलेली नृत्य-नाट्ये लोकप्रिय आहेत. आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशांत पोहोचला. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली. यावर्षी आपण इ.स.पू. ३००० ते इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला. पुढील वर्षी आपण इसवी सनाच्या नवव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. इ.स.९ वे शतक ते १८ वे शतक या कालखंडातील इतिहासास ‘मध्ययुगीन इतिहास’ असे म्हणतात.

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ