वैदिक संस्कृती

वैदिक संस्कृती


४.१ वैदिक वाङ्मय 
४.२ कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन 
४.३ शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन 
४.४ धर्मकल्पना 
४.५ शासनव्यवस्था 

४.१ वैदिक वाङ्मय 
‘वेद’ वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना ‘संहिता’ असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे. त्यापासून ‘वेद’ ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना ‘श्रुति’ असेही म्हणतात. 

ऋग्वेद संहिता - 
ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ‘ऋग्वेद’ होय. ‘ऋचा’ म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सूक्त’ असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. 

यजुर्वेद संहिता -
 यजुर्वेद संहितेमध्येे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. 

सामवेद संहिता -
 काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरांत मंत्रगायन केले जाई. ते गायन कसे करावे, याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. 

अथर्ववेद संहिता -
 अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे, याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. 

ब्राह्मणग्रंथ -
 यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे सांगणाऱ्या ग्रंथांना ‘ब्राह्मणग्रंथ’ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत.  केलेले चिंतन ‘आरण्यक’ ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, याची खबरदारी यात घेतलेली दिसते. 
उपनिषदे -
‘उपनिषद्’ म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म-मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. चार वेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. 

४.२ कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन

 दैनंदिन जीवन वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे ‘गृहपती’ असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. 
ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. 

गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे ‘कूड’. या घरांच्या जमिनी शेणा-मातीने सारवलेल्या असत. घरासाठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात ‘यव’, ‘गोधूम’, ‘व्रीहि’ यांसारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू (बार्ली). गोधूम म्हणजे गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता.

 वेदकाळातील घरे वेदकाळातील वाद्ये वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. ‘निष्क’ नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. 

त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठीही होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत.

४.३ शेती,पशुपालन,आर्थिकआणि सामाजिक जीवन -
वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. 
खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गाईंचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती. इतरांंनी गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी.त्यालामाणसाळवूनरथालाजोडण्यातवेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. 

भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले, आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. माहीत अाहे का तुम्हांला? घोड्याला ‘अश्व’ असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला ‘अश्वशक्ती’ (हॉर्स पॉवर) असे म्हणतात. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. 

‘श्रेणी’ या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला ‘श्रेष्ठी’ म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्रअसेवर्णहोते.हेवर्णव्यवसायावरूनठरत.नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातिव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे, यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना ‘चार आश्रम’ असे म्हटलेले आहे. 
पहिला आश्रम म्हणजे ‘ब्रह्मचर्याश्रम’. गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत, अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे ‘वानप्रस्थाश्रम’.  या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूरजावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी रहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे ‘संन्यासाश्रम’. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये, असा संकेत होता. 

४.४ धर्मकल्पना -
वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. 

पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधीपार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा. हे नियमित असणारे सृष्टिचक्र आहे. सृष्टिचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ‘ऋत’ असे नाव दिले. 
प्राणिमात्रांचे जीवन हाही सृष्टिचक्राचाच एक भाग आहे. सृष्टिचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत, असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे, असे समजले जाई.

४.५ शासनव्यवस्था -
 वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. त्याला ‘ग्रामणी’ असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे ‘विश्’. त्याच्या प्रमुखाला ‘विश्पति’ असे म्हणत. अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले. ‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. 

करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला ‘भागदुघ’ असे म्हणत. ‘भाग’ म्हणजे वाटा. ‘जन’च्याउत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा, तो भागदुघ. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’, ‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’ अशा चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत. ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस ‘समिती’ असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे.

पुढे वैदिक विचारप्रवाहात ‘स्मृति’ व ‘पुराण’ नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने ‘हिंदू’ या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्याबाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते.



Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ