मौर्यकालीन भारत

मौर्यकालीन भारत


७.१ ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी
७.२ मौर्य साम्राज


७.१ ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी -

ग्रीक सम्राट अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर याने इ.स.पू. ३२६ मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना ‘सत्रप’ असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इ.स.पू. ३२३ मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते, त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची नाणीही  

अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. 


७.२ मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य 

 चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पू. ३२५ च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले

मेगॅस्थिनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या ‘इंडिका’ या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागढजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने ‘सुदर्शन’ नावाचे धरण बांधलेले होते. तसा  उल्लेख असलेला शिलालेख आहे. . 

सम्राट अशोक 
 चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरीत्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. 

कलिंगचे युद्ध
 कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत् हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख ‘देवानं पियो पियदसी’ (देवाचा प्रिय प्रियदर्शी) असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदयपरिवर्तन झाले, याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली-टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होत

अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य -
 अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. 

अशोकाची लोकोपयोगी कामे -
 अशोकाने प्रजेसाठी सुखसोई निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ, माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे, अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. 

मौर्यकालीन राज्यव्यवस्था  
मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोईसाठी साम्राज्याचे चार विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. 
१. पूर्व विभाग - तोशाली (ओडिशा), 
२. पश्चिम विभाग - उज्जयिनी (मध्य प्रदेश), 
३. दक्षिण विभाग - सुवर्णगिरी (कर्नाटकातील कनकगिरी), 
४. उत्तर विभाग - तक्षशिला(पाकिस्तान) 
राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते.

 मौर्यकालीन लोकजीवन -
 मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातूकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौकाबांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर  धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्येे आणि ग्रामांमध्ये उत्सव, समारंभ साजरे होत. त्यांमध्येलोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्‌धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्‌धिबळाला ‘अष्टपद’ असे नाव होते.

मौर्यकालीन कला आणि साहित्य 
 सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर चारही बाजूंस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील तीनच आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वांत प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्येही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ